Monday, January 22, 2007

'कितवा'चा भाषावैज्ञानिक उलगडा
- चिन्मय विजय धारूरकर
( हा केवळ सारांश, पूर्ण शोधनिबंधासाठी:http://chinmayvijay.blog.com/1564062/)
`कितवा' हा शब्द आपण मराठीत जरी सर्रासपणे वापरत असलो तरी अन्य कित्येक भाषांमध्ये या प्रश्नार्थक-सर्वनामासाठी पर्यायी शब्दच सापडत नाही.हिन्दी,इंग्रजी,अरबी अशी भाषांची यादीच बनवता येईल ज्यांत `कितवा'ला पर्याय सापडत नाही.मराठीत `कितवा' जसा आहे तसा गुजरातीत केटलामो,कन्नड मध्ये एष्टनेय,तेलुगूत एन्नोवं,फ़ारसीत चॅन्दोम,जर्मनमध्ये वी फ़िल्टं इ. भाषांत चपखल पर्याय सापडतात.
(अ)संस्कृतात `कतम' हा शब्द `कितवा'चा पर्याय म्हणून लोकप्रिय असला तरी त्यासाठीचा चपखल शब्द `कतम' नसून `कतिथ' आहे - हे (पाणिनीय सूत्रे व संस्कृत साहित्यातील उदाहरणे म्हणजेच `कतम' व `कतिथ' चे आढळ उद्धृत करून) साधार स्पष्ट करणे हा या शोधनिबंधाचा एक हेतू.
(आ)बरेच कोशकार`कतिथ' या शब्दिमासाठी इंग्रजीत`हाउमेनिअथ'/`हाउमेनिअस्ट'(मोनिअर विलिअम्स,२००३/१८९९:२४६) असा कृतक शब्द निर्माण करतात.त्याप्रमाणे हिन्दीसाठीही कोशकार `कितनवा'(सूर्यकान्त,१९८१) अशी शब्दनिर्मिती करतात.या निबंधात या गोष्टीचाही शोध घेण्यात आला आहे की इंग्रजीतील fourth, fifth, sixth यातील `-th' हा प्रत्यय व संस्कृतातील चतुर्थ, षष्ठ, कतिथ व कतिपयथ यातील `थुक्'(पाणिनीय संज्ञेनुसार)प्रत्यय म्हणजेच `थ' हे सजातीय (cognate) आहेत काय?

(इ) १.क्रमवाचक(`डट्'चा तमडागम)
2.तमभाववाचक(`तमप्'प्रत्यय जो उत्तम,सुन्दरतम,प्रियतम इ.त दिसतो)व
३.जतिपरिप्रश्नातील(`डतमच्' जो कतम मध्ये दिसतो).अशा तीन`तम' प्रत्ययांची सविस्तर चर्चा करून त्यांतील साम्यभेदावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.
(ई)"तरभाववाचक रूपे व द्विवचने (एखाद्या भाषेत असणे) यांत संबंध आहे काय?" हा प्रश्न व त्यावर काही निश्चित उत्तर देण्यासाठी येणा-या अडचणी,यांचाही विचार या शोधनिबंधात करण्यात आला आहे.

No comments:

शाब्द

शाब्द

About Me

My photo
मी एक आपला साधासुधा बर्‍यापैकी सुमार असा भाषाविज्ञानाचा विद्यार्थी! बाकी एखाद्या Definite Description चा निर्देश माझ्याने व्हावा असले काही कर्तब आपण गाज़वलेले नाही. हां, एवढं कदाचित म्हणता येईल की मराठीतून आंतरजालावर शीवर लिहणारा पहिला...